*वटवृक्ष पुजन - वटवृक्ष दान आणि वटवृक्ष रोपणाने वटपौर्णिमा साजरी....*
*धरती बचाओ परिवाराचे वनश्री. जनाबापू मेहेत्रे यांचा पुढाकार..*
मुन्ना ठाकूर
भारतीय सांस्कृतिक परंपरेचा भाग म्हणून वटसावित्री पौर्णिमा हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो.या निमित्ताने सौभाग्यवती महिला माता-भगिनी उपवास धरून हाच जन्म आणि पती सात जन्म मिळावा यासाठी वटवृक्षाकडे साकडे घालतात.ही सौभाग्यवतींची श्रद्धा !
वट सावित्री पौर्णिमेला आधुनिकतेची जोड दिल्यास काळाची गरज ओळखून वाढते जागतिक तापमान व ढासळलेले पर्यावरण संतुलन यावर जालीम उपाय म्हणजे वटवृक्षारोपण. सौभाग्यवती महिला माता भगिनींच्या श्रद्धा जपत धरती बचाओ परिवाराचे सी.एम.डी. वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने सौभाग्याचे प्रतिक म्हणून पती-पत्नीने वटवृक्ष पूजन करून त्याचे रोपण करण्याचे आवाहन केले होते.यासाठी लागणारी वटवृक्ष रोपटे त्यांच्याकडून मोफत मिळतील असे अभिवचन त्यांनी दिले होते.गेल्या अनेक वर्षांपासून ते ही परंपरा वाढवत आलेले आहेत.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मातृतिर्थ सिंदखेड राजा देऊळगाव राजा पांगरी तथा परिसरात सौभाग्यवती महिला व पुरुषांनी सौभाग्याचे प्रतिक म्हणून मनोभावे वटवृक्ष पूजन करून त्याचे रोपण केले.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता वाडीकर व वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात सौभाग्य वटवृक्षाचे रोपण केले.
कार्यक्रम प्रसंगी वनश्री.जना बापू मेहेत्रे यांनी उपस्थित महिलांना निरामय जीवनासाठी वृक्षारोपण तथा पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले.तर मोफत वटवृक्ष रोपटे हवे असल्यास संपर्क साधण्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर सुनीता वाडीकर व डॉक्टर प्रशांत वाडीकर यांनी उपस्थित महिलांना वडाच्या झाडाचे व निरामय जीवनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाल पर्यावरण प्रेमी निर्मिक मेहेत्रे व निसर्गा मेहेत्रे यांनी परिश्रम घेतले.
