*देश सेवेतून परतलेल्या सैनिकांचे गावात पुष्पवृष्टीने स्वागत*
*संग्रामपूर:* धार्मिक,सांस्कृतिक वारशासह देश सेवेची मोठी परंपरा असलेल्या पातुर्डा येथील गावात भारतीय सैनिक दलातून परतलेल्या भारतीय सैनिकांचे ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
यावेळी गावात देशप्रेम व भावनिक वातावरण निर्माण झाले होते. दिनांक २२/०४/१९९७ ते आजतागायत गेली २४ वर्षे भारतीय सैनिक दलात कार्यरत असलेले श्री प्रभुदास झाडोकार दिनांक ३१/३/२०२१ रोजी भारतीय सैनिक दलातून निवृत्त होऊन घरी परतत असल्याचे पातुर्डा येथील ग्रामस्थांना कळताच गावकऱ्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली होती.यात युवकांचा सहभाग हा फार मोठ्या प्रमाणावर होता. कोरोना असल्याने डिजेच्या हजेरीला फाटा देण्यात आला.परंतु पुष्पवृष्टी करत त्यांना घरापर्यंत नेण्यात आले.
गावाच्या प्रवेश दाराजवळच असलेल्या महादेव मंदिर परिसरात ते येताच त्यांचेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.यानंतर उपस्थित मान्यवरांसह गावकऱ्यांनी शाल,श्रीफळ, हार तुरे देऊन त्यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला.त्यानंतर त्यांना त्यांच्या घरापर्यंत नेण्यात आले.
यावेळी प्रत्येक घरासमोर महिलांनी त्यांचे औक्षण करून पंचारती ओवाळल्या. गावात प्रचंड उत्साहाचे तसेच भावनिक वातावरण निर्माण झाले होते. घरासमोर एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सेवानिवृत्त सैनिक श्री प्रभुदास अंबादास झाडोकार यांनी पातुर्डा खुर्द वासियांचे आभार व्यक्त करत गावकऱ्यांमध्ये देशप्रेम हे ओतप्रोत ठासून भरले असल्यानेच आज माझा येथे यथोचित सत्कार केला जात असल्याचे सांगत आपण देशसेवा करत असलेल्यांसाठी असेच प्रेम कायम ठेवा असे आवाहन देखील त्यांनी गावकऱ्यांना तसेच तेथील उपस्थितांना केले.
पातुर्डा खुर्द येथील अनेक युवक आन-बान शान म्हणून देश सेवेसाठी सैन्यात भरती झाले आहेत.पंचक्रोशीत पातुर्डा खुर्द नगरीची ओळख सैनिक असलेले गाव म्हणून आहे. येथील प्रभुदास अंबादास झाडोकार हे सेवा पूर्ण करुन आपल्या जन्मगावी परतले. गाववासियांनी हा अभिमानाचा क्षण उत्साहाने साजरा केला. "द मराठा लाईट ईनफंट्री" मध्ये कार्यरत प्रभुदास झाडोकार हा जवान भारत भुमीचे रक्षण करुन सेवा निवृत्त झाला.
यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.
यावेळी सरपंच नंदाताई मानकर, उपसरपंच प्रघोष झाडोकार, वडील अंबादास झाडोकार, ज्ञानेश्वर झाडोकार, सुरेश झाडोकार, विलास मानकर,भारत वाघ,अॅड विरेंद्र झाडोकार, विलास येनकर,संदिप झाडोकार, गणेश झाडोकार,संजय झाडोकार,अॅड निवृत्ती वाघ, नरेंद्र झाडोकार,दत्ता डिक्कर, निलेश म्हसाळ,नंदू म्हसाळ, मंगेश येनकर, प्रविण झाडोकार, समाधान खंडेराव,गोपाल रहाटे आदी बरीच गावकरी मंडळी उपस्थित होते.