मेंडकी विविध विकासकामांचे भुमिपूजन

मेंडकी विविध विकासकामांचे  भुमिपूजन


ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि

मनोज अगळे 9765874115





   मेंडकी दि. 19 ऑगस्ट :  ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी परीसर हा सिंचनाच्या दृष्टीने परिपूर्ण होत असून लवकरच गोसेखुर्द कालव्यावर मेंडकी उपसा जलसिंचन योजना मंजूर होत आहे. रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा अंतर्गत आदी कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात मेंडकी ला विकासात प्रथम क्रमांकावर आणण्याचे आपले उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

       मेंडकी येथे रामनगर हनुमान मंदिर सभागृहाचे भूमिपूजन  करतांना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे,जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर,मेंडकी ग्रामपंचायत सरपंच सो.मंगला ईरपाते, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मंगला लोनबले जिल्हा परिषद माजी सदस्या भावना ईरपाते, उपविभाग अभियंता (सा. बां.) कुचनवार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर ग्रामपंचायत सदस्या श्रीमती नयना गुरनुले, ग्रामपंचायत सदस्या सौ जयश्री आंबोरकर, ग्रामपंचायत सदस्या सौ कुंदाताई कोरेवार, ग्रामपंचायत सदस्या सौ पुष्पा गभने, ग्रामपंचायत सदस्या सौ मोक्षाली शेंडे, ग्रामविकास अधिकारी अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

       मेंडकी परीसरात सर्व विकासात्मक कामे करण्याचा आपला मानस आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, रामनगर येथील नागरिकांना यापुर्वीच्या लोकप्रतिनिधी फसवणूक करुन खोटी आश्वासने दिली पण कामे केली नाही.नागरीकांना मंदिर परिसरात विविध कार्यक्रम करतांना बसण्याची सुध्दा सुविधा नव्हती. ही परिस्थिती पाहून दिलेले आश्वासन पूर्ण करुन २०लक्ष रुपयाचे रामनगर टोली हनुमान मंदिर सभागृहाचे भूमिपूजन करतांना अतिशय आनंद होत आहे. भविष्यात पुन्हा या परीसरात सिमेंट काँक्रिट रस्ते बांधकाम करण्यात येईल.

      पुढे पालकमंत्री म्हणाले, मेंडकी येथील ३५लक्ष रुपयाचे सामाजिक सभागृह लवकरच पुर्णत्वास येईल. मेंडकी नाल्यावर कोल्हापूरी बंधारा बांधकामासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता पाच कोटी रुपये, नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत नळ देण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजने करीता तीन कोटी रुपये उपलब्ध करून देवु. मेंडकी बसस्टँडवर थंड पाण्याचे आरो मशिन साठी १५.७५ लक्ष रुपये, जिल्हा परिषद शाळेतील संरक्षण भिंत बांधकाम साठी १३.५लक्ष रुपये मंजूर आहेत. पैशाचा ओघ मेंडकी गांवासाठी सुरू झाला असुन मेंडकी येथे ३३ केव्ही विद्यृत सबस्टेशनसाठी पाच कोटी प्रस्तावित करण्यात आले असून लवकरच सुरू होणार, महाराष्ट्रात नविन तालुके निर्माण करताना मेंडकीला तालुका करण्यात येणार असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

        यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler