बुलडाण्यात पत्रकार भवनासाठी ५० लाख रुपयांचा निधी;आमदार संजय गायकवाड यांची घोषणा ;
अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी.
:-बुलडाणा शहरात भव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन बांधण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा आमदार संजय गायकवाड यांनी आज,२८ मार्च रोजी केली.बुलडाणा येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हि घोषणा केली.
बुलडाणा येथील पत्रकार भवन अपुरे पडत असल्याने त्याचे विस्तारीकरण व्हावे अशी मागणी अनेकदा पत्रकारांच्या वतीने करण्यात आली होती.त्यामुळे आता ५० लक्ष रुपयाचे काम प्रस्तावित आहे.३१ मार्च पूर्वी हा निधी मंजूर होईल आणि पुढच्या दोन - तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
राजमाता मा जिजाऊ,छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी राजेंचे एकत्रित मंदिर उभारणार
राजमाता मा जिजाऊनी छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली.छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि धर्मवीर संभाजी राजांनी स्वराज्याचे रक्षण केले.अनेक परकीय आक्रमकांनी इथली मंदिरे उद्धवस्त केली होती.अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार राजमाता मा जिजाऊ,छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजेंनी केला.मात्र त्यांचे एकत्रित मंदिर देशात कुठेही नाही.त्यामुळे शिवप्रेमी सुचवतील त्या ठिकाणी तिघांचे एकत्रित मंदिर बुलडाणा शहरात उभारण्यात येईल आणि त्यासाठी ५० लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येईल असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
बुलडाणा शहरात उभारणार अत्याधुनिक स्वच्छ्तागृह
बुलडाणा शहरात बाजारासाठी बाहेरगावावरून महिला येतात.मात्र लघुशंकेसाठी त्यांची कुचंबणा होते.सार्वजनिक शौचालयात स्वच्छता राहत नाही.त्यामुळे महिला तिकडे जात नाहीत.त्यामुळे अत्याधुनिक असे एक शौचालय बुलडाणा शहरात उभारणार असून त्यासाठी ७० लक्ष रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.बुलडाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जयस्तंभचौकात हे शौचालय असेल असे संजय गायकवाड म्हणाले.येत्या महिनाभरात हे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.बुलडाणा शहरात एमपीएससी आणि युपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका उभारण्यात येणार आहे.त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. कानडे पार्क शाळेच्या जागेवर हि अभ्यासिका उभी राहणार आहे.५० लाख रुपयांची पुस्तके या अभ्यासिकेसाठी देण्यात येणार असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
